विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): ज्ञान प्रबोधिनी पब्लिक स्कूलमधील अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील आणि अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी शिक्षकाचा जामीन अर्ज गंगापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला.

तपासादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी शाळेतील त्याच वर्गातील अनेक अल्पवयीन मुलींची विधाने नोंदविली. तसेच या मुलींची विधाने बीएनएसएस. कलम १८३ अंतर्गत माननीय दंडाधिकार्यांसमोरही रेकॉर्ड करण्यात आली आहेत. या सर्व मुलींनी फिर्यादीतील आरोपांची पुष्टी करत आरोपी शिक्षक त्यांच्या खाजगी अंगावर किंवा शरीरावर अयोग्य पद्धतीने स्पर्श करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, सद्यस्थितीत या सर्व पीडित विद्यार्थिनींच्या सुसंगत व गंभीर विधानांवर अविश्वास करण्याचे कोणतेही कारण नाही. 

आरोपी हा त्याच शाळेत शिक्षक असल्याने त्याचा विद्यार्थ्यांवर प्रभाव असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. त्यामुळे जामीन दिल्यास तो पीडित मुलींना धमकावणे, पुराव्यांशी छेडछाड करणे किंवा फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले. या सर्व परिस्थितींचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. बहाळकर यांनी आरोपीचा जामीन अर्ज ११ डिसेंबर २०२५ रोजी नामंजूर करण्याचा आदेश दिला.